कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर निघालेल्या ६ महिलांचा कालका मेलखाली चिरडून 6 महिलांचा मृत्यू

Foto
मिर्झापूर  : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे कालका एक्सप्रेस ट्रेनने दिलेल्या धडकेत सहा महिलांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्टेशनवर रक्ताचा सडा पडला. चुनार रेल्वे स्टेशनवर सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. चोपनहून एक प्रवासी ट्रेन चुनार रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आली. गर्दीमुळे काही यात्रेकरू प्लॅटफॉर्मवरून न उतरता रुळाच्या दुसऱ्या बाजूला गेले. दरम्यान, कालका एक्सप्रेस विरुद्ध ट्रॅकवर येत होती. यावेळी सात-आठ जणांना ट्रेनने धडक दिली. त्यापैकी बहुतेक महिला होत्या. रेल्वे ट्रॅकवर अनेक प्रवाशांच्या मृतदेहांचे तुकडे विखुरलेले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की कालका एक्सप्रेसला चुनार येथे थांबा नाही, म्हणूनच ती वेगाने प्रवास करत होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अपघात इतक्यात क्षणात झाला की कोणालाही परिस्थिती समजून घेण्यास वेळ मिळाला नाही.

ट्रेन गेल्यावर रुळांवर मृतदेह विखुरलेले दिसले
  
ट्रेन गेल्यावर रुळांवर मृतदेह विखुरलेले दिसले. कार्तिक पौर्णिमेमुळे स्टेशनवर गर्दी असूनही, ट्रेनचा वेग कमी करण्यात आला नाही आणि ती प्लॅटफॉर्मवरून गेली. मृतदेह बॅगमध्ये भरून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले. गंगा घाट रेल्वे स्टेशनपासून 2-3 किमी अंतरावर आहे. बहुतेक महिला गटात गंगेत स्नान करण्यासाठी जात होत्या. अपघातानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अपघाताची दखल घेतली आहे.

मृतांपैकी पाच जण मिर्झापूर आणि एक सोनभद्रमधील 

उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने मंत्री संजीव गौर आणि जिल्हा दंडाधिकारी पवन गंगवार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे मंत्र्यांनी सांगितले. यापैकी पाच महिला मिर्झापूर जिल्ह्यातील होत्या, तर एक सोनभद्र येथील होती. सर्वजण गंगेत स्नान करण्यासाठी चुनार येथे येत होते. सरकार मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करेल. प्लॅटफॉर्म बदलण्याबाबत मंत्री संजीव गौर यांनी सांगितले की हा तपासाचा विषय आहे.

रुळांवर 50 मीटर अंतरावर मृतदेहांचे तुकडे विखुरले

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अपघात इतका भीषण होता की रुळांवर सुमारे 50 मीटर अंतरावर मृतदेहांचे तुकडे विखुरलेले होते. पोलिसांनी मृतदेह पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये गुंडाळले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. प्रत्यक्षदर्शी भागीरथी म्हणाल्या की, आम्ही सर्व खमारियाचे रहिवासी आहोत. आम्ही चुनारमधील वाळू घाटावर आंघोळ करण्यासाठी जात होतो. आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर चढताच अचानक ट्रेन आली आणि सर्वांना धडक बसली.